इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : खेड तालुक्यातील सावरदरी गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एटीएमच्या गाळ्याचे कुलूप गॅस कटरने तोडून आतील १५ लाख ८१ हजार रुपये चोरट्यांनी चोरुन नेले. एवढेच नाही तर चोरी करताना गॅस कटरमुळे एटीएम मशीन जळाल्याची घटना घडली.
ही घटना सावरदरी गावातील वासुली फाटा येथे शुक्रवारी (०९) रात्री साडेआठ ते शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत प्रमोद परब (वय-३८, रा. लोहगाव) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील सावरदरी गावात वासुली फाटालगत हिताची प्रॉपर्टीडेक्स सर्व्हिसेस मार्फत एटीएम मशीन गाळ्यामध्ये उभारण्यात आले आहे. दरम्यान, चोरट्यांनी एटीएम गाळ्याचे कुलूप गॅस कटरने तोडले.
तसेच गाळ्यातील एटीएम मशीनचा दरवाजा गॅस कटरच्या सहाय्याने कट करुन एटीएममधील १५ लाख ८१ हजार ४०० रुपये चोरुन नेले. चोरी करताना आग लागल्याने या आगीत ४ लाख रुपयांचे एटीएम मशीन जळून खाक झाले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.