Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूज'उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफीकेट'साठी मागितली ५ हजारांची लाच; महा-ई-सेवा केंद्र चालकासह महिला...

‘उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल सर्टिफीकेट’साठी मागितली ५ हजारांची लाच; महा-ई-सेवा केंद्र चालकासह महिला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

दिघी : उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त ५ हजार रुपये लाच घेताना महा ई-सेवा केंद्र चालक आणि महिला कॉम्प्युटर ऑपरेटर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार दिघी येथील गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्रात घडला आहे.

संतोष बबन वाळके (वय-४८ वर्ष, गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्र चालक, दिघी), नंदा राजू शिवरकर (वय-३६ वर्ष, पद-कॉम्प्युटर ऑपरेटर, गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्र) अशी आरोपींची नवे आहेत. याबाबत ५४ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दिली आहे. त्यावरून दिघी पोलीस ठाण्यात दोन्ही लोकसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्र, दिघी येथे गेले होते. त्यावेळी आरोपी संतोष वाळके व नंदा शिवरकर यांनी तक्रारदार यांच्याकडे आमची तहसिल कार्यालयात ओळख आहे. उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे दिली होती.

या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्र चालक संतोष वाळके व त्यांच्या महा-ई-सेवा केंद्रात काम करणारी महिला नंदा शिवरकर यांनी तक्रारदार यांचेकडे उत्पन्नाचा दाखला व डोमीसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. दरम्यान, नंदा शिवरकर यांनी तक्रारदार यांचेकडून २ हजार ५०० रुपये लाच पंचासमक्ष स्विकारल्याचे तपासात आढळून आले.

दोन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेविरुद्ध दिघी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विरनाथ माने करत आहेत. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments