इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे शहरात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक शाळांमध्ये तसेच स्कूल व्हॅनचालक, वाहकाककडून चिमुरड्या मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना उडकीस आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील स्कूल बस, व्हॅन आणि रिक्षांच्या तपासणीसाठी पुणे प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्याकडून वायुवेग पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या पथकाने चारशेहून अधिक वाहनांची तपासणी करत ११७ स्कूल बस व व्हॅनचालकांवर कारवाई केली आहे. तसेच नोटीस देऊन ४ लाख ७४ हजारांचा दंड वसूल केला आहे.
स्कूल चालकांच्या चारित्र्याचा प्रश्न तर निर्माण होतोच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक सुरक्षित होण्यासाठी पुणे आरटीओने कडक भूमिका घेत सर्व स्कूलवस, चालक आणि रिक्षा यांची तपासणी करण्यासाठी चार वायुवेग पथके नेमण्यात आली. त्यानुसार पहिल्याच दिवशी (दि. ४) शहरातील विश्रांतवाडी, वडगावशेरी, विमाननगर, वाघोली, हडपसर, लोणीकंद, सासवड, सातारा रोड, बिबवेवाडी, कात्रज, खडकी आणि मशिन चौक परिसरातील शाळा परिसरासह
रस्त्यावर धावणाऱ्या स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी करण्यात आली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी दिली.
सायंकाळी सहा वाजेपर्यंत पथकाकडून जवळपास चारशे स्कूल बस आणि व्हॅनची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट आहे का? चालकाची चारित्र्य पडताळणी झाली का? बसमधील विद्यार्थ्यांची संख्या, मुलींच्या बसमध्ये महिला मदतनीस आहे का? यासह अन्य बाबींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ११७ जणांवर कारवाई करत त्यांना नोटीस देण्यात आली. तर, १८ शाळांना भेटी देऊन अधिकाऱ्यांकडून जनजागृती करण्यात आली.
एकूण कारवाईत पावणेपाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही ही कारवाई सातत्याने सुरू राहणार आहे. आरटीओच्या पथकाकडून शाळांमध्ये जाऊन शिक्षक, विद्यार्थी यांना वाहतूक नियमनासह मुलांच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यायची, विशेषतः लहान मुलींच्या सुरक्षिततेबाबत काय खबरदारी घ्यावी याबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन आणि सूचना करण्यात आल्या आहेत. स्कूल बस, व्हॅनमधील मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील दोन दिवसांत दोन घटना घडल्या असून, त्यामुळे पुणे हादरून गेले आहे.