इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला असून, आंदोलनाला तीव्र वळण लागले आहे. मागील चार दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी दावा केला आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे राज्यात दंगली घडवण्याचे कारस्थान करत आहेत. “त्यांचे काही खाजगी मेसेज आमच्या हाती लागले असून, त्यातून दंगल घडवण्याचे संकेत मिळत आहेत,” असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.
गिड्डे पाटील म्हणाले की, “शिंदे सरकारच्या काळात मराठा समाजाच्या काही मागण्या मान्य झाल्या होत्या. मात्र तरीही समाज पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर आहे. आधी हा विषय संपल्याचे भासवत होते, पण आता पुन्हा आरक्षणाचा मुद्दा चिघळलेला आहे. यात काही असुरी शक्तींचा सहभाग असून, आंदोलनाच्या आडून दंगल घडवण्याचा कट रचला जात आहे.”
तसेच, या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्याची मागणीही गिड्डे पाटील यांनी केली आहे. “या समितीत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांचा समावेश करून, त्यांचा अहवाल राज्य सरकारने मान्य करावा,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले हे आंदोलन कोणत्या वळणावर जाईल, हे आगामी घडामोडींवर अवलंबून आहे. मात्र, रोहित पवारांवर करण्यात आलेले आरोप आणि वाढता राजकीय तणाव लक्षात घेता, राज्यातील परिस्थिती अधिकच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.