इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः नात्यांची वीण किती घट्ट असते आणि प्रेमाची खोली किती अथांग असते, याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण पुण्यात समोर आले आहे. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी एका मुलाने आपल्या वडिलांना जीवदान देण्यासाठी स्वतःच्या शरीरातील ७० टक्के यकृत दान करून रक्ताच्या नात्याची आणि त्याही पलीकडे माणुसकीची एक नवीन परिभाषा लिहिली आहे. ही केवळ एक वैद्यकीय घटना नसून, प्रेम, निःस्वार्थ त्यागाची एक प्रेरणादायी गाथा आहे.
२१ वर्षीय चैतन्य पठारे यांच्या वडिलांना अचानक ‘लिव्हर सोयरासिस’ या जीवघेण्या आजाराने ग्रासले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तातडीने यकृत प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. हे ऐकून पठारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. योग्य डोनर शोधण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले, विविध चाचण्या केल्या गेल्या, मात्र अपेक्षित यश मिळत नव्हते.
सर्वत्र डोनरचा शोध सुरू असताना, रक्तगट आणि आरोग्य निकषांमुळे पर्याय कमीच मिळत होते. अशावेळी, चैतन्यने स्वतः पुढाकार घेतला. त्याने डॉक्टरांकडे जाऊन स्वतःच्या चाचण्या करण्याची विनंती केली. सर्व चाचण्या केल्यानंतर चैतन्य हा वडिलांसाठी योग्य डोनर ठरू शकतो हे स्पष्ट झाले.
सुरुवातीला कुटुंबातील सदस्यांनी, विशेषतः त्याच्या आईने, चैतन्यच्या या निर्णयाला तीव्र विरोध केला. “तू अजून लहान आहेस, उद्या तुला काही झाले तर काय?” अशा शब्दांत त्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु चैतन्यच्या निर्धारासमोर कोणतीही अडचण टिकली नाही. “वडिलांनी मला घसरलो तेव्हा सांभाळले. आज त्यांना आधाराची गरज आहे. अशावेळी मी त्यांच्यासाठी काहीच केले नाही, तर काय उपयोग?” या त्याच्या भावनिक शब्दांनी सर्वांनाच निःशब्द केले. चैतन्यने दाखवलेल्या या धाडसाचे आणि निःस्वार्थ प्रेमाचे पुण्यात सर्वत्र कौतुक होत आहे.