इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरूस्थित केम्पेगौडा आंतरराष्ट्रीयविमानतळावर कन्नड अभिनेत्री रान्या रावकडून १४.२ किलो सोने जप्त करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या सोन्याची किंमत १२.५६ कोटी रुपये आहे. यानंतर रावच्या घरातील झडतीतूनही २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटींची रोकड जप्त करण्यात आली. सोने तस्करीप्रकरणात अभिनेत्रीला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर तिला १४ दिवसांची न्यायिक कोठडी सुनावण्यात आली आहे.
एमिरेटस एअरलाइन्सच्या विमानाने अभिनेत्री रान्या राव ३ मार्च रोजी उशिरा दुबईहून बंगळुरूमध्ये दाखल झाली होती. यावेळी गोपनीय माहितीच्या आधारावर महसूल गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तिची झडती घेतली. यावेळी तिच्याकडून १२.५६ कोटी रुपये किमतीचे १४.२ किलो सोने जप्त करण्यात आले. अभिनेत्रीने चिकटपट्टीच्या मदतीने सोन्याची बिस्किटे आपल्या मांडीला चिटकविलेली होती. कोणालाही संशय येऊ नये म्हणून तिने या सोन्यावर वैद्यकीय पट्टी गुंडाळली होती.
अभिनेत्रीने गत १५ दिवसांमध्ये ४ वेळा दुबईचा दौरा केल्याने अधिकाऱ्यांनी तिच्यावर लक्ष ठेवले होते. विमानतळावरील कारवाईनंतर तस्करी प्रकरणात अभिनेत्रीच्या घराचीही झडती घेण्यात आली. यावेळी घरातून २.०६ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटींची रोकड जप्त केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १७.२९ कोटी रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
अभिनेत्री रान्या राव ही भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकारी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रामचंद्र राव हे सद्यःस्थित ‘कर्नाटक राज्य पोलीस गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. अभिनेत्री रान्या राव हिने ‘माणिक्य’ आणि ‘पाटकी’ सारख्या कन्नड चित्रपटात काम केले आहे.