इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
औंढा नागनाथ : तालुक्यातील जवळा बाजार परिसरात मागीलकाही दिवसांत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मंगळवारी (दि.१८) दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात औंढा नागनाथ पोलिसांना यश आले. या टोळीकडून कार, तलवार, रॉड, मिरची पुडा व १७ रिकामे पोते असे दरोडा टाकण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक जी.एस. राहिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माधव जिव्हारी, जमादार इम्रान सिद्दीकी, दिलीप नाईक, अंबादास बेले, राम गडदे, शेख मतदार यांचे पथक मंगळवारी (दि.१८) गस्तीवर होते. पहाटेच्या सुमारास जवळाबाजार शिवारात काही जण दरोडाच्या तयारीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
पथकाने तातडीने जवळा बाजार येथील बाजार समितीच्या परिसरात पाहणी केली. यात सहा जणांची टोळी असल्याचे दिसून आले. मात्र, पोलिसांना पाहताच तिघे पळून गेले. यावेळी पोलिसांनी दीपकसिंग चव्हाण, संदीपसिंग चव्हाण, हरदीपसिंग चव्हाण यांना अटक केली. उर्वरित आरोपीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बादलसिंग चव्हाण, गोविंदसिंग चव्हाण, सुंदरसिंग चव्हाण (सर्व रा. वसमत) यांना अटक केली. पोलिसांनी अटक केलेल्या सहा जणांकडून कार, लोखंडी रॉड, तलवार, टॉमी, मिरची पुडा, नायलॉन दोरी, लोखंडी कटर, नायलॉनचे १७ रिकामे पोते व आठ हजार रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.