इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शहापूर : लग्नाच्या हळदी कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याच्या रागातून २१ वर्षीय युवकाची चाकूने भोसकून हत्या करून मृतदेह भातसा नदीत फेकल्याची घटना शहापूर तालुक्यातील कासगाव हद्दीत घडली. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बाळू वाघ (२१, रा. कासगाव, ता. शहापूर) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली. बाळू वाघ हा काजगावमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. तर, याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही १७वर्षीय अल्पवयीनही याच गावात राहतात.
२५ मार्च रोजी शहापूर तालुक्यातील कासगाव हद्दीत लग्नाच्या हळदी समारंभात बाळू हा नाचत असताना त्याचा धक्का या अल्पवयीनांना लागला, यावरून त्यांचा वाद झाला. त्यानंतर दोन्ही अल्पवयीनांनी निर्जनस्थळी गाठून बाळूवर चाकूने वार करत त्याची हत्या करून मृतदेह भातसा नदीपात्रात फेकून दिला आणि घटनास्थळावरून फरार झाले. दुसऱ्या दिवशी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना दिसून आला. जीवरक्षक पथकातील सदस्यांच्या सहकार्याने मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.