इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील मंगळवार पेठेतील मालधक्का चौकातील जागेचे आरक्षण बदलण्याचा प्रकार सुरू असतानाच हडपसरमधील 15 व 16 या दोन्ही सर्व्हे क्रमांकामधील उद्यान, प्रसूतिगृह व धोबी घाट यांच्या आरक्षित जागेचे आरक्षण बदलण्याचा घाट घातला आहे. सर्व्हे क्र. 15 मधील आरक्षण सर्व्हे क्र. 16 मध्ये स्थलांतरित करून प्रसूतिगृहाची जागा बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा घाट घातला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यानुसार हडपसर येथील सर्व्हे क्र. 15 व 16 मध्ये प्रसूतिगृह आरक्षित केले आहे. सर्व्हे क्र. 16 मधील जागा धोबी घाटासाठी आरक्षित केली असून, याच जागेत जुलै 2019 मध्ये शहीद सौरभ फराटे यांच्या स्मारकाच्या विकासासाठी जागा मंजूर केल्याचा ठराव महापालिकेत मंजूर करण्यात आला होता. सर्व्हे क्र. 15 व 16 मधील जागेवर महापालिकेने शहीद हेमंत करकरे उद्यान विकसित केले आहे.
सर्व्हे क्र. 15 व 16 मधील जागा ही पाटबंधारे विभागाकडे असल्याने महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे ऑगस्ट 2019 मध्ये 3 कोटी 25 लाख 18 हजार 300 रुपये भरले आहेत. मात्र, त्यावेळी पाटबंधारे विभागाच्या बैठकीत झालेल्या ठरावामध्ये केवळ सर्व्हे क्र. १६चा उल्लेख केला होता. मात्र, सर्व्हे क्र. 15 चा उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यामुळे संबंधित जागा ताब्यात येण्यास महापालिकेला अडचणी येऊ लागली. उशिरा जाग आलेल्या महापालिकेने यासंदर्भात पाटबंधारे विभागाकडे पत्रव्यवहार करून ठरावात सर्व्हे क्र. 15 चा उल्लेख करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा प्रकार उघडकीस आला.
काही माजी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी यासाठी फल्डिंग लावली आहे. त्यानंतर सर्व्हे क्र. 15 मधील प्रसूतिगृहासाठी आरक्षित जागेचे सर्व्हे क्र. 16 मध्ये स्थलांतर करून बांधकाम व्यावसायिकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू केला. हा प्रकार काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष मोहन जोशी, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, नंदकुमार आजोतीकर यांनी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासमोर मांडला. दरम्यान, डॉ. भोसले यांनी त्याची गांभीर्याने दखल घेत अपर आयुक्त महेश पाटील, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांना सूचना दिल्या. हडपसरमधील प्रसूतिगृह व उद्यानाच्या जागेच्या स्थलांतराचा प्रकार आमच्यासमोर आला आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी सांगितले.
महापालिकेने पाटबंधारेकडुन सर्व्हे क्र. 15 मधील जागा कायदेशीर मार्गाने ताब्यात घ्यावी. सर्व्हे क्रमांक 15 व 16 मध्ये प्रसूतिगृह, धोबीघाट व शहीद फराटे स्मारक विकसित करावे, अशी मागणी जोशी व सुरसे यांनी केली आहे