इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : स्वारगेट बस स्थानकात चोरीची घटना घडली आहे. येथे एसटी बसमध्ये चढताना महिलेच्या बॅग मधून दागिने, मोबाईल तसेच रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्नेहल संजय खोपकर (वय ३९ वर्ष, रा. आंबेगाव) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या रविवारी (१ जून २०२५) रोजी पुण्याहून गावी चालल्या होत्या. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास त्या स्वारगेट बसस्थानकात आल्या. तेथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतून सोन्याचांदीचे दागिने, मोबाईल फोन तसेच रोख रक्कम पळवली.
दरम्यान, बॅगेतून साहित्याची चोरी झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर तात्काळ त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याबाबत पोलीस परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून चोरट्याचा शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.