इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : स्वारगेट बस स्थानकावर एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने पुण्यासह राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असताना आता या प्रकरणातील पीडितेची बदनामी करणाऱ्या खोट्या, अवमानकारक, असंवेदनशील आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालावी, असा पीडितेच्या वकिलांनी केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी फेटाळला असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय कायद्यानुसार जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना या संदर्भात आदेश काढण्याचे विशेष अधिकार राज्य सरकारने दिले आहेत असे सांगत न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले यांनी पीडितेच्या वकिलांचा प्रतिबंधात्मक आदेशाचा अर्ज फेटाळला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्याची आवश्यकता असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असून न्यायालयाला असा आदेश देण्याचा अधिकार नाही. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा दाखला या प्रकरणाला लागू होत नाही, असे नमूद करत न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.
२५ फेब्रुवारी रोजी स्वारगेट डेपोतील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याने एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. यानंतर न्यायालयाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तथापि, काही राजकारणी, पोलिस अधिकारी आणि वकिलांनी पीडितेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी विधाने केली. त्यामुळे या प्रकरणी पीडितेच्या वतीने खोट्या आणि असंवेदनशील विधानांवर बंदी घालण्याची मागणी वकील असीम सरोदेंनी केली होती.