इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे यांच्या वकिलांनी पीडितेच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करणारे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने पीडितेला 7500 रुपये दिले असल्याबाबत कोणताही युक्तिवाद झालेला नसताना केवळ प्रसिद्धीसाठी न्यायालयात आरोपीच्या वकिलाने पिडीतेचे चारित्र्य हनन करणारे वक्तव्य केले. त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकारामुळे पीडितेला मानसिक त्रास सहन करावा लागत असून, वकिलाच्या या वागणुकीवर कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दत्तात्रय गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर अॅड. वजिद खान-बिडकर, अॅड. साजिद शाह आणि अॅड. सुमित पोटे यांनी आरोपीचे वकीलपत्र घेतले. मात्र, सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर बोलताना अॅड. पोटे यांनी आरोपीने पीडितेला 7500 रुपये दिले होते असा दावा केला. विशेष म्हणजे न्यायालयात हा मुद्दा कधीही मांडला गेला नव्हता. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी पीडितेचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आरोप होत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे पीडितेला समाज माध्यमांवरून मानसिक छळाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान आरोपीच्या वकिलांना माध्यमांनी आज घेरलं आणि आरोपीने पीडितेला 7500 रुपये दिले असल्याचं आपण न्यायालयामध्ये न सांगता माध्यमांना खोटी माहिती का दिल्याचे विचारल असता आरोपीच्या दोन्ही वकिलांनी वक्तव्यावर सारवासारव केली. वकिलांनी माध्यमांसमोर चुकीची माहिती दिल्यामुळे पीडितेच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आरोपीच्या वकिलांची भूमिका संशयास्पद बनली आहे. आरोपीच्या बचावासाठी खोटी माहिती पसरवून पीडितेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.