इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंडः तालुक्यातील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत मल्लीकनाथ मठाजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात तीनही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. हा अपघात आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास झाला आहे.
या भीषण अपघातात दोन वाहनावरील चालक जखमी झाले आहेत. यातील आयशरचा चालक गोविंद जाधव हा गंभीर जखमी आहे. त्यांना महामार्ग पोलीस मदत केंद्र आणि भिगवण पोलिसांनी तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या बल्कर टँकर (MH 46 BU 4592) हा रस्त्याच्या कडेला उभा होता. या उभ्या असलेल्या बलकरला पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पो (MH 26 BE 5622) ने जोराने धडक दिली आणि याचवेळी आयशर टेम्पोच्या पाठीमागून येत असणाऱ्या कंटेनर ने (MH 13 CU 5487) देखील आयशर टेम्पोला पाठीमागून धडक दिली. आयशर टेम्पो व कंटेनर हे एकमेकांवर जोरात आदळल्याने दोन्ही वाहनांच्या वाहनचालक हे गंभीररित्या जखमी झाले व गाडीच्या कॅबिनमध्ये अडकून पडले होते.
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस मदत केंद्र अपघातस्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करत जखमींना ‘आपुलकीची सेवा’ रुग्णवाहिकेमधून नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.