इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 100 शहरे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट केली जातील अशी घोषणा करून ही योजना राबवली. मात्र प्रत्यक्षात गाजावाजा केलेल्या या स्मार्ट सिटी योजनेबाबत आता माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी केलेल्या आरोपाने खळबळ उडाली आहे. स्मार्ट सिटी योजना पुण्यासह सर्व शहरात अपयशी ठरत आहे. संपूर्ण शहर स्मार्ट करणे दूरच राहिले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे नेते आश्वासनं देत राहिले आणि पुणेकरांनी भाजपला मते दिली. या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
स्मार्ट सिटी योजनेत 2016 साली शंभर शहरांमध्ये पुण्याचा समावेश केला. पहिल्या टप्प्यासाठी बाणेर, बालेवाडी भागाची निवड करण्यात आली. मात्र विकसित असलेल्या या परिसरातही स्मार्ट सिटी योजना अपयशी ठरली असल्याचा आरोप काँग्रेसचे मोहन जोशी यांनी केला आहे, यासंबंधीच एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आल असून त्यांनी हा आरोप केला आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने तातडीने याचा हिशोब पुणेकरांना द्यावा अशी मागणी देखील या पत्रकातून करण्यात आली आहे. कारण प्रत्यक्षात मात्र पुणेकरांची फसवणूक झाली आहे. पारदर्शी प्रशासन, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा, शैक्षणिक सुविधा, आधुनिक आरोग्य केंद्रे, कार्यक्षम पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प अशी उद्दिष्टे स्मार्ट सिटी योजनेची सांगण्यात आली. मात्र, 10 टक्केही सुधारणा झालेल्या नाहीत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
स्मार्ट सिटी या योजनेचे आमिष दाखवत भाजपने पुणेकरांना फसविले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने याचा हिशोब पुणेकरांना द्यावा, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.