इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः गोड बोलून अल्पवयीन मुलीला घरी घेऊन जात तिच्याकडून तब्बल 4 वर्ष बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात घडला होता. याप्रकरणी 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. आता या गुन्ह्यातील 4 आरोपींना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षाच्या शिक्षेसह दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कोमल सुनील मोरे उर्फ कोरे (वय-26 रा. कोथरुड, पुणे, मुळ गाव भोर, जि पुणे), रेश्मा महेश गायकवाड उर्फ रेश्मा सुरोसे (वय-29, उत्तमनगर पुणे), सुनिल ब्रिजलाल कोरी (वय-29, येवलेवाड, मुळ गाव-उत्तरप्रदेश) व जसाराम भयाराम सुतार (वय-57, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी 16 वर्षीय पिडीतेने भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय अल्पवयीन निर्भयाचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सन 2018 मध्ये निर्भया एका कपड्याच्या दुकानात काम करीत होती. दरम्यान, आरोपी कोमल मोरे सोबत फिर्यादीची ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत कोमलने गोड बोलून फिर्यादीला कात्रजला आणले. त्यानंतर आई, बहिण व भावाला मारण्याची धमकी देऊन कोमल मोरे व तिची मैत्रीण रेश्मा गायकवाड यांनी फिर्यादीला लॉजवर नेले. तिच्याकडून बळजबरीने 2018 ते 2021 या कालावधीत वेश्याव्यवसाय करून घेतला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार 9 आरोपींच्या विरोधात पिटा अॅक्ट, पॉस्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, भोर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. अटक केल्यानंतर या गुन्ह्याचा खटला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु होता.
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केलेले युक्तिवाद व 12 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना 10 वर्षांची शिक्षा व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. हे आदेश पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी दिले.
या खटल्यात सरकारी वकील नितीन कोंघे यांना भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णा पवार, पोलीस निरीक्षक प्रविण मोरे, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचीत व सहाय्यक फौजदार आयाज शेख यांची बहुमुल्य मदत मिळाली.