इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या थायलंडच्या भूकंपानंतर आता महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात ही आज भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा येथे 2.6 रेक्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सांगोला हे या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे.
सोलापूर भूकंपाच्या धक्क्याने हादरल असून साधारणपणे आज सकाळी 11 वाजून 22 मिनिटांनी काही क्षणासाठी हे भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती आहे. सुदैवाने या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणत्याही पद्धतीची हानी झालेली नाही. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात भूकंपाचे केंद्रस्थान आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने याबाबतचे ट्विट करत माहिती दिली आहे.
दरम्यान 1993 मध्ये किल्लारी येथे झालेल्या भूकंपावेळी सोलापूर जिल्ह्यात ही भूकंप झाला होता, त्यानंतर आज सकाळी सोलापूर जिल्ह्यात भूकंप झाला आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सातत्याने भूकंपाचे धक्के बसत असतात. येथील कोयना परिसरात भूकंपाचे केंद्र असते, सौम्य भूकंपाच्या धक्क्यांनी येथील परिसर काहीसा हादरुन जातो.