इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे) घरात एकटी असल्याची संधी साधत एका 35 वर्षीय महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (ता. 03) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी एका इसमावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन शंकर सावंत (वय 44, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) असे विनयभंग करणाऱ्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी एका 35 वर्षीय महिलेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी फिर्यादी या आपल्या घरी एकट्या असताना आरोपी सचिन सावंत याने त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर त्याने फिर्यादीचा हात पकडून “कोणाला काही बोलू नको, ओरडू नको” असे म्हणत विनयभंग केला.
तसेच, तिच्याशी अश्लील वर्तन करून हाताने मारहाण व शिवीगाळ केली. यामुळे फिर्यादीने लगेचच स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दरम्यान, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीवर कलम 74, 333, 115(2), 352, 351(2) (3) भादंवि तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 च्या कलम 3 (i) (r), 3(i)(s), 3(ii) (va), 3(i) (w) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस हे तपास करत आहेत.