इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी यांसारख्या अभ्यासक्रमाकडे यंदा विद्यार्थ्यांचा ओढा असल्याचे दिसून येत आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ७ लाख ६४ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज भरले आहेत. मागील वर्षी ७ लाख २५ हजार ७७३ इतके अर्ज आले होते. तसेच गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा विक्रमी संख्येने अर्ज आले आहेत.
सीईटी सेलकडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यंदा सीईटी सेलने या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी डिसेंबरमध्येच नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती. त्यामध्ये एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी ३० डिसेंबरला नोंदणी सुरू करण्यात आली. त्याची मुदत २८ फेब्रुवारीला संपली. त्यानुसार, यंदा एमएचटी-सीईटीसाठी राज्यभरातून ८ लाख ९४ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ७ लाख ६४ हजार ३६८ विद्याथ्यांनी प्रवेश परीक्षेचे शुल्क भरून नोंदणी अंतिम केली आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सीईटी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३८ हजार ५९५ ‘ने वाढली आहे. २०२१-२२ मध्ये ५ लाख ०५ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. तर, २०२२-२३ मध्ये ६ लाख ६ हजार ७९० विद्यार्थी अर्ज, २०२३-२४ मध्ये ६ लाख ३६ हजार ८०४, २०२४-२५ मध्ये ७लाख २५ हजार ७७३ तर यंदा २०२५-२६ साठी ७ लाख ६४ हजार ३६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एमएचटी-सीईटी परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यानुसार, पीसीबी ग्रुपची एमएचटी-सीईटी परीक्षा ९ ते १७ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे. तर, पीसीएम ग्रुपची एमएचटी-सीईटी परीक्षा १९ ते २७ एप्रिलदरम्यान होणार आहे, असे सीईटी सेलने जाहीर केले आहे. यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक असे ४ लाख ६३ हजार अर्ज भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा ग्रुप असलेल्या सीईटी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी भरले आहेत. तर, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या ग्रुपची सीईटी देण्यासाठी तीन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.