इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नसरापूर (पुणे): भोर तालुक्यातील सारोळा गावात रविवारी (दि. २९जून) मध्यरात्री चोरीचा प्रयत्न फसला. सारोळा-वीर रस्त्यावरील ‘एस मार्ट’ या दुकानात दोन अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी केली. मात्र, दुकानात लावलेल्या आधुनिक मोशन सेन्सर अलार्ममुळे सायरन वाजल्याने चोरटे काहीही चोरी न करता पळून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री पावणे दोनच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा वाकवून आत प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होते. दुकानात पाय टाकताच मोशन सेन्सर अलार्मने हालचाल ओळखून तीव्र आवाजात सायरन सुरू केला. अचानक सायरनचा आवाज ऐकताच चोरटे घाबरले आणि घटनास्थळावरून तात्काळ पळाले.
घटनेनंतर काही वेळातच परिसरातील नागरिक व दुकानाचे मालक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरटे कॅमेऱ्यात कैद झाल्याचे स्पष्ट झाले. फुटेजमध्ये त्यांच्या हालचाली आणि चेहऱ्याचे काही अंश देखील स्पष्टपणे दिसून येतात.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, ‘एस मार्ट’मधील सुरक्षा यंत्रणा इतर दुकानदारांसाठीही आदर्श ठरली आहे.