इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : शहरातील एका नामांकित कंपनीला गंडा घालत 40 लाख 90 हजार 605 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. मात्र सायबर पोलिसांच्या प्रयत्नामुळे अखेर या कंपनीची फसवणूक टळली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एका नामांकित खासगी कंपनीतील अधिकाऱ्याने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्याला सायबर चोरट्याने अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअप मेसेज केला होता. या मेसेजमध्ये आपण कंपनीचा एमडी असल्याचं चोरट्याने भासवलं. एका मीटिंगमध्ये असून हा त्यांचा वैयक्तिक क्रमांक असल्याचं त्यांना सांगितलं. तसेच दुसरे एका कंपनीचे पेमेंट तात्काळ करावयाचे आहे अशी बतावणी करत ४१ लाख रुपये एका बँक खात्यात जमा करण्याची सूचना संदेशात दिली होती. त्यानंतर कंपनीच्या वित्त विभागाकडून बतावणी करणाऱ्या चोरट्याच्या खात्यात ४० लाख ९० हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात आले. फसवणुकीचा प्रकार उघडकीस झाल्यानंतर कंपनी प्रशासनाकडून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
सायबर पोलिसांच्या प्रयत्नामुळे अखेर या नामांकित कंपनीची फसवणूक टळली. पोलिसांनी चोरट्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्याची विनंती बँकेला केली. पोलिसांच्या तत्परतेने तपास केल्याने खासगी कंपनीला रक्कम परत मिळवून देण्यात यश आले.
ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे, पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलीस कर्मचारी नवनाथ कोंडे, किरण जमदाडे, अश्विनी भोसले, ज्योती दिवाणे, माधुरी कराळे, सोनाली चव्हाण यांच्या पथकाने केली.