Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजसायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक 'सायबर लॅब'

सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्याधुनिक ‘सायबर लॅब’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : शहरात सायबर फसवणुकीच्या घटना वाढल्या असून, दररोज नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक होत आहे. अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पुणे पोलिसांकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानानी सुसज्ज ‘सायबर लॅब’ उभारण्यात येणार आहे. तसेच, सायबर सेलमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणाली विकसित करण्यासह पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

फेडेक्स कुरिअर, ऑनलाइन टास्क जॉब, क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा, महावितरण, एमएनजीएल बिल भरण्याच्या नावावर नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार सुरू आहेत. आक्षेपार्ह रील्स, व्हिडिओ आणि संदेश प्रसारित केल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. सध्या सायबर पोलिस ठाणे आणि पोलिस ठाण्याच्या पातळीवर तपास करण्यात येत आहे. परंतु गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी अत्याधुनिक सायबर लॅब सुरू करण्यात येणार आहे. येत्या १५ जूनपर्यंत ‘सायबर लॅब’चे काम पूर्ण करण्यात येईल, असे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी सांगितले.

सायबर गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार-

सध्या पुणे सायबर पोलिस ठाण्यात केवळ एक पोलिस निरीक्षक, सात पोलिस उपनिरीक्षक आणि ३८ पोलिस कर्मचारी इतकेच मनुष्यबळ आहे. गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहता प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आता ठाण्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही सायबर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तक्रारदारांचा जबाब नोंदविणे, गुन्ह्याचा तपास वेळेत व्हावा, आरोपीचे बँक खाते गोठविणे अशा प्रकारचे प्रशिक्षण पोलिसांना दिले जाणार आहे. तसेच, सायबर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना मदत करण्यासाठी व्यावसायिक स्तरावरील सायबर तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. या पॅनेलमध्ये ३० सायबर तज्ज्ञांचा समावेश असेल. त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळेल, असे बलकवडे यांनी सांगितले.

अशी असेल ‘ई-ऑफिस’ प्रणाली

राज्य सरकारकडून ‘ई-ऑफिस’ प्रणाली राबविण्यात येत आहे. त्याची पोलिस आयुक्त कार्यालयात अंमलबजावणी सुरू आहे. आता नवीन सायबर सेलमध्येही ‘ई-ऑफिस’ प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यात नागरिकांकडून तक्रार अर्ज स्वीकारण्याची पद्धत विकसित केली जाणार आहे. तक्रारीच्या स्वरूपानुसार वर्गीकरण करून तो अर्ज संबंधित डेस्कला जाईल. या अर्जाचे ‘स्टॅम्पिंग’ करून तक्रार क्रमांक दिला जाईल. अर्जदाराला टोकन क्रमांकही दिला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments