इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात एका सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोन आरोपींना येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी प्रवीण विकास कसबे (२९, रा. आंबेगाव, कात्रज) आणि प्रतीक दादासाहेब रणवरे (२५, रा. सद्गुरु रेसिडेन्सी, सिंहगड कॉलेज, येवलेवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अमोल अरुण गायकवाड यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याच बरोबर आकाश उद्धव कोपनर (रा. गोकुळनगर, कात्रज) या सराईत गुन्हेगारावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस विकत घेणाऱ्या दोन आरोपींना येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील आकाश कोपनर हा एक सराईत गुन्हेगार असून आरोपी आकाशने गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी मागच्या वर्षी बिबवेवाडी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. याबरोबरच आरोपी आकाश कोपनरवर लूटमार केल्याचा दौंड पोलीस ठाण्यात तर एकाला मारहाण केल्याचा गुन्हा कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल आहे.
दरम्यान, येरवडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकास दोघे जण पिस्तूल विकत घेण्यासाठी येणार आहेत याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बुधवारी (५ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास येरवडा परिसरातील वाडिया बंगल्याजवळ सापळा रचला. यानंतर आरोपी प्रवीण कसबे आणि प्रतीक रणवरे यांना सराईत आकाश कोपनर याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस विकत घेताना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. मात्र आकाश कोपनर हा चकवा देऊन पळून गेला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळंके हे करत आहेत.