इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातबाजारभावापेक्षा कमी किमतीत लोकांना स्वस्त सोने उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केलेली सरकारी योजना आता बंद होणार आहे. या योजनेंतर्गत अनेकांना स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी मिळाली होती. मात्र, आता ही संधी मिळणार नसून, योजनाच बंद केली जाणार आहे.
‘सार्वभौम सुवर्ण बाँड’ अर्थात SGB असे या सरकारी योजनेचे नाव आहे. या योजनेचा आत्तापर्यंत अनेकांनी फायदा घेतला आहे. मात्र, आता ही योजना बंद करण्याबाबत हालचाली सुरु आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यासंबंधीचे संकेत दिले आहेत. शनिवारी अर्थसंकल्पानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी आम्ही SGB योजना बंद करण्याच्या विचारात आहोत, असे म्हटले आहे. अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या मोदी 3.0 च्या पूर्ण बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. परंतु SGB योजनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
याबाबत आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यांनीही दुजोरा दिला आहे. ‘गोल्ड बाँड स्कीम’ सरकारसाठी खूप महागडे कर्ज घेणारी ठरत आहे आणि ही एक मोठी समस्या आहे, सरकारने आता या अंतर्गत पुढील हप्ते न देण्याचा निर्णय घेतला आहे. भूतकाळातील अनुभवांवरून असे दिसून आले आहे की हे सरकारसाठी खूप महागडे कर्ज असल्याचे सिद्ध झाले आहे, त्यामुळे या मार्गाचा अवलंब न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे सार्वभौम गोल्ड बाँड योजना?
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू झाली. या योजनेअंतर्गत सरकार लोकांना बाजारापेक्षा कमी किमतीत सोन्यात गुंतवणूक करण्याचा पर्याय देते. याशिवाय ऑनलाईन शॉपिंगवर 50 रुपये प्रति ग्रॅमची सूटही उपलब्ध आहे. तसेच 2.5 टक्के निश्चित व्याज दिले जाते. या योजनेअंतर्गत कुटुंबातील प्रत्येक सदस्य जास्तीत जास्त 4 किलो सोने खरेदी करू शकतो.