Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजसत्ताधारी भाजपची दडपशाही: सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आंदोलनामुळे शिवसेना प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांच्यावर...

सत्ताधारी भाजपची दडपशाही: सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील आंदोलनामुळे शिवसेना प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांच्यावर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सत्ताधारी भाजपविरोधात केलेली “गुंड आणि झुंडशाही विरोधातील सह्यांची मोहीम ” पुण्यात चांगलीच चर्चेत होती. हेच आंदोलन भाजपच्या नेत्यांना आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना झोंबले असून त्यांनी प्रशासनावर दबाव आणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत यांच्यावर शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे असा आरोप ऊबाठा गटाने केला आहे.

विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या आकाशचिन्ह विभागाने दिलेल्या पत्रावर दाखल करण्यात आला. भाजप लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांविरोधात साम, दाम, दंड, भेद नीती वापरत त्यांचा विरोध संपवत असल्याचा आरोप अनंत घरत यांनी केला आहे.

घरत म्हणाले, महाराष्ट्रात भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या सरकारच्या सुरू असलेल्या झुंडशाही, गुंडशाहीविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नुकतेच शनिपार चौकात सह्यांची निषेध मोहीम राबविण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देत महाराष्ट्रात अशांतता पसरवू पाहणाऱ्या आमदार नितेश राणेला अटक करा, अशी मागणी केली होती. वाचाळवीर नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळेच ठाण्यात आमदार गणपत गायकवाड याने पोलीस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार करायचे धाडस केले. अनेक गुन्हेगारांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयापर्यंत पोहोचविले. पुणे शहरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण यावर गृहमंत्री सपशेल फेल झाले आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सह्यांची मोहीम राबविण्यात आली. यावेळी महिला आघाडीच्या वतीने बांगड्यांचा आहेर सहांच्या फलकावर लावून निषेध करण्यात आला होता.

अनंत घरत म्हणाले की, संपूर्ण शहरात वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे मात्र भाजप “मोदी की ग्यारंटी” हे शहरातील विविध ठिकाणी भिंती रंगवत शहर विद्रुप करत आहे हे प्रशासनाला दिसत नाही. आम्ही केलेल्या आंदोलनामुळे भाजप विरोधात लोकांनी उघडपणे भूमिका घेत सह्यांच्या मोहिमेबरोबर खास पुणेरी टोमणे मारले. हेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना झोंबले. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी प्रशासनावर दबाव आणत गुन्हा दाखल करायला भाग पाडले. विरोधी पक्षातील मोठ्या नेत्यांना ईडी आणि इतर यंत्रणा वापरत जेरीस आणून त्यांना भाजपमध्ये घेतले जाते. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर असे गुन्हे दाखल करून त्यांना कोर्टकचेरीत अडकवून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. मात्र यामुळे भाजप केवळ विरोधक संपवत नाही तर देशातील लोकशाही संपवत चालली आहे. हे आंदोलन झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय आणि पोलीस स्टेशनला भाजपचे नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी वेळोवेळी जात दबाव आणत होते हे यावरून सिद्ध होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments