इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : राज्यात सकाळी गारवा आणि दुपारीउन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचे दिसत आहे. किमान व कमाल तापमान लक्षणीय बदलत आहे. गुरुवारी सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान 37.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात येत्या 3 दिवसांत हळूहळू कमाल तापमान वाढणार आहे. तसेच कोरडे व शुष्क हवामान राहणार असून नागरिकांना उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे.
राज्यात हवामान कसं असणार?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, गेल्या 24 तासांत, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील मैदानी भागांत किमान तापमान 1 ते 3 अंशांनी घटले आहे. तर, बिहार आणि गंगेच्या पश्चिम बंगालमधील काही भागांत 1 ते 2 अंशांनी वाढले आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण व गोवा ठिकाणी सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद करण्यात आली असून 1.6-3.0 अंशांनी वाढलेले होते.
मध्य भारतात तापमान पुढील 24 तासांत 1 ते 3 अंशांनी कमी होईल, त्यानंतर 4 दिवसांत 2 ते 4 अंशांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 13 फेब्रुवारी रोजीच्या नोंदीनुसार, काही भागांत कमाल तापमान 40 अंशांच्या जवळ पोहोचले असून, रात्रीच्या तापमानातही चढ-उतार दिसत आहे.
राज्यातील तापमानाची स्थिती.
सातारच्या कराड येथे राज्यातील सर्वाधिक 40.3°C तापमान नोंदवण्यात आले आहे. नंदुरबारच्या शहादा येथे 39.0°C, पुण्यातील राजगुरुनगर 38.4°C, लोनावळा 38.2°C, सोलापूर 38.5°C आणि चंद्रपूर 37.8°C तापमानाची नोंद झाली. विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी तापमान 35°C पेक्षा जास्त आहे. कोकणातही तापमानाचा चढा कल दिसून आला. रत्नागिरी येथे 33.7°C, पालघर येथे 35.1°C, तर कोल्हापूरमध्ये 34.2°C तापमान नोंदले गेले.