Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजशेलपिंपळगाव येथील पूल बनला मृत्यूचा सापळा

शेलपिंपळगाव येथील पूल बनला मृत्यूचा सापळा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

चाकण, ता. २० : चाकण-शिक्रापूर मार्गावरील शेलपिंपळगाव (ता. खेड) येथील भीमा नदीवरील पुलास ५० वर्षे झाली आहेत. सध्याची त्याची दुरवस्था झालेली आहे. पुलास तीन ठिकाणी तडे गेले आहेत. एका ठिकाणी कठडा तुटला आहे तर काँक्रिटचा काही भाग निखळला आहे. लोखंडी ग्रीलही तुटले आहे. पुलावरून दररोज कंटेनर, ट्रेलर, टँकर, बस, मालवाहू ट्रक, मोटार अशी पन्नास हजार अवजड वाहने ये-जा असतात. अरुंद पुलामुळे दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे.

पुलावरील नित्याच्या कोंडीमुळे दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात. येथे होत असलेल्या लहानमोठ्या अपघातांमुळे प्रवाशी, वाहनचालक, नागरिक संताप व्यक्त करत आहेत. धोकादायक बनलेल्या या पुलाचे संबंधित विभागाने पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केलेले नाही. यामुळे येथे नवीन पूल उभारण्याची मागणी नागरिक तसेच उद्योजकांकडून होत आहे. सुमारे ५० वर्षापूर्वी पूल उभारण्यासाठी शासनाकडे तत्कालीन स्वर्गीय मोहिते गुरुजी यांनी उपोषण आदी करून पूल उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता.

दरम्यान, शिक्रापूर, नगर, मराठवाडा तसेच मुंबई, तळेगाव, चाकण परिसराला जोडणारा हा चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील महत्त्वाचा पूल आहे. चाकण, तळेगाव, (मावळ) शिरूर, रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील सर्व अवजड वाहनांची वाहतूक नगर, मराठवाडा, मुंबईकडे जाणारी पुणे-नाशिक कडे जाणारी मोठ्या प्रमाणात या पुलावरून होते. पुलाची रुंदी ही फक्त पंचवीस फूट आहे. हा पूल तीस ते पस्तीस फूट उंचीचा आहे.

दरम्यान, पुलाचा मार्ग यमराज मार्ग असून प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा झालेला आहे. या पुलाचे लवकर काम करावे. या पुलाला नवीन पर्यायी पूल उभारण्यात यावा. असे सामाजिक कार्यकर्ते श्रीनाथ लांडे, रामहरी आवटे, प्रकाश वाडेकर यांनी सांगितले.

स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज पुलावरून ट्रक, टेम्पो अगदी नदीपात्रात पडलेले आहेत. त्यामुळे अपघात होऊन गेल्या पाच वर्षात वीस जणांचे मृत्यू झालेले आहेत तसेच काही जखमी झाले आहेत. या पुलाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. पुलाच्या कडेला मोठ्या प्रमाणात घाण, कचरा, मैला टाकला जातो. हा पूल दगडी बांधकामाचा असल्याने त्याला काही ठिकाणी तडे गेल्याने तो धोकादायक आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकांची, प्रवाशांची आहे.

चाकण-शिक्रापूर मार्गाचे हस्तांतरण (एनएचएआय) राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे झालेले आहे. शेलपिंपळगाव पुलाला काही ठिकाणी तडे पडले आहेत अशी जर परिस्थिती असेल तर त्याबाबत त्यांना माहिती देण्यात येईल. – राहुल कदम, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments