इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना पीककर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा कोणताही विचार नाही, अशी स्पष्ट भूमिका स्पष्ट केल्यानंतर या विषयावर राजकारण पेटले. या प्रकरणावर आता राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले जाईल, शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुतीच्या अजेंड्यावर आहे. सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी निर्णय घेईल असे स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे. आम्ही दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करणार आहोत. महायुती सरकारने एक रुपयात पीक विमा, शेतमालास अनुदान आणि ‘लाडकी बहिण’ सारख्या योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे केली आहे. कोणतीही योजना बंद झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ही निर्णय होईल असे त्यांनी स्पष्ट सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितल्यानंतर महायुती सरकारला विरोधकांनी घेरले असून, निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली जात आहे. कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी नाराज असून, सरकारवर मोठा दबाव वाढत आहे. महायुतीच्या कर्जमाफीच्या वचनाचे काय झाले? असा सवाल उपस्थित केला जात आहे.