इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : शेअर बाजारातील गेल्या 10 दिवसांच्या घसरणीला आज (बुधवारी) ब्रेक लागला आहे. सेन्सेक्स आज हिरव्या चिन्हासह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्हींमध्ये आज वाढ झाल्याचे पाहिला मिळाले. बुधवारच्या व्यवहारात भारतीय शेअर बाजारात जोरदार वाढ दिसून आली. निफ्टीने सलग 10 दिवसांच्या घसरणीचा कल तोडला आणि एक टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाला.
सेन्सेक्स 740 अंकांच्या वाढीसह 73730 वर होता आणि निफ्टी 254 अंकांच्या वाढीसह 22337 वर होता. बाजारातील तेजीमुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर सूचिबद्ध सर्व कंपन्यांचे मार्केट कॅप 9 लाख कोटी रुपयांनी वाढून 393 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मंगळवारी 384 लाख कोटी रुपये होते. लार्जकॅपसोबतच मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही खरेदी दिसून येत आहे.
निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1,160 अंक वाढीसह 49168 वर बंद झाला आणि निफ्टी स्मॉलकॅप 100 निर्देशांक 436.50 अंक वाढीसह 15199 वर बंद झाला. बाजारातील जवळपास सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. ऑटो, आयटी, पीएसयू बँक, फायनान्शिअल सर्व्हिसेस, मेटल, रियल्टी, एनर्जी, इन्फ्रा आणि पीएसई या निर्देशांकात मोठी वाढ झाल्याचे पाहिला मिळाले.
‘या’ शेअरमध्ये दिसून आली तेजी
अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, एम अँड एम, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, आयटीसी, भारती एअरटेल, एचसीएल टेक, नेस्ले, एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि इन्फोसिस हे सेन्सेक्स सर्वाधिक वाढल्याचे दिसून आले.