इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीत रविवारी मध्यरात्री अडीच वाजता झालेल्या स्फोटामुळे खळबळ उडाली. याप्रकरणी अवघ्या तीन ते चार तासात पोलिसांनी दोन संशयीतांना अटक केली आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून या चौकशीत महत्त्वाचा पुरावा पोलिसांना सापडला आहे. संशयित विजय गव्हाने याने स्फोट घडवून आणण्यापूर्वी जिलेटीन स्फोटकांबरोबर व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.
या मशिदीत स्फोट घडवण्यापूर्वी संशयित आरोपी विजय गव्हाणे याने ‘शिस्तीत रहा बेट्या, मी अंगार, भंगार नाय रे’, असे गाणं लावून, हातात जिलेटीनच्या कांड्या आणि तोंडात सिगारेट ठेवून इंस्टाग्रामवर ‘रील’ बनवले आहे.. या घटनेत बीड पोलिसांना हा व्हिडिओ भक्कम पुरावा ठरणार आहे. परंतु जिलेटीन स्फोटकं त्याने कोठून मिळवली, याचा तपासात बीड पोलिसांनी वेग घेतला आहे. यात काही धक्कादायक खुलासे तपासात समोर येण्याची शक्यता बीड पोलिसांकडून वर्तवली जात आहे.
संशयित आरोपी विजय गव्हाणेबरोबर श्रीराम सागडे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे. संशयित आरोपींनी हा कट कधी, केव्हा आणि कुठे रचला याची माहिती पोलीस घेत आहेत. जिलेटीन स्फोटकांची वाहतूक कशी आणि कोणी केली, याच्या तपासासाठी बीड पोलिसांनी वेग घेतला आहे. या घडलेल्या घटनेने अर्धमसला गावातील प्रार्थनास्थळाबरोबर बीड जिल्ह्यातील संवेदनशील भागात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.