इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः शिवसेना गटाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे आणि भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या शिवसेना (उबाठा) गटातील माजी नगरसेवक विशाल धनवडे यांची मकरसंक्रांत पर्वात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलजमाई झाली. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते. देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असताना, राज्यातील महायुतीच्या घटक पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये एकवाक्यता असून, आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. माजी नगरसेवक विशाल धनवडे म्हणाले, खरी शिवसेना कोणती याबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर अनावधानाने उद्धव ठाकरे असे उत्तर दिले गेले. त्याबद्दल कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
महायुतीतील आम्ही सर्वच पक्ष एकदिलाने काम करत असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेबद्दल आमच्या सर्वांच्या मनात नितांत प्रेम, आदर आणि विश्वास आहे. शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे म्हणाले, धनवडे यांनी केलेल्या खुलाशानंतर आमच्या मनात त्यांच्याबद्दल किंवा भाजपमध्ये नुकत्याच प्रवेश केलेल्या शिवसेना (उबाठा) नगरसेवकांबद्दल कोणताही आक्षेप नाही. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वडीलकीच्या नात्याने आमची एकत्र भेट घडवून आणली, त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. पुणे शहराच्या विकासासाठी या पुढील काळात आम्ही महायुती म्हणून एकदिलाने काम करणार आहोत. विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, प्राची आल्हाट या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला.