इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई | 4 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचा मोशन पोस्टर पाहून त्याचं तोंडभरून कौतुक केलं. त्यांनी या चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा झाली आणि त्यासोबतच मोशन पोस्टन प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपाटातून छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील न उलगडलेली पानं प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये चित्रपटाचं पहिलं मोशन पोस्टर शेअर केलं. त्यासोबतच त्यांनी लिहिलं, ‘धर्मसंरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट ‘शिवरायांचा छावा’ येत्या 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, निर्माते मल्हार पिचर्स आणि वैभव भोर, किशोर पाटकर तसेच संपूर्ण टीमला शुभेच्छा’
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘सुभेदार या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता सुभेदार चित्रपटाच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. लांजेकर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि या व्हिडीओच्या माध्यमातून दिग्पाल यांनी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर तर जिजाऊसाहेबांच्या भूमिकेत अभिनेत्री मृणाल कुलकर्णी झळकणार आहेत. याशिवाय विक्रम गायकवाड, अभिजीत श्वेतचंद्र, भूषण विनतरे, अमित देशमुख असे कलाकार झळकणार आहेत. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
“छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम मोठ्या पडद्यावर साकारायला मिळणं हे माझं परमभाग्यच आहे असं मी मानतो”, या शब्दांत दिग्पाल लांजेकरांनी ‘शिवरायांचा छावा’ चं मोशन पोस्टर प्रदर्शित करताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या चित्रपटाविषयी बोलताना ‘मल्हार पिक्चर कंपनी यांनी म्हटलं, “ऐतिहासिक सिनेमा बनवणं हे आमचं कायमच स्वप्नं होतं आणि त्यातही महाराष्ट्राचे लाडके युवराज छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा मांडता येणं यापेक्षा दुसरं भाग्य काय असेल. हा चित्रपट करताना घेतला गेलेला अतिशय उत्तम आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे दिग्पाल लांजेकर यांची लेखक आणि दिग्दर्शक म्हणून केलेली निवड या ऐतिहासिक कथेच्या दिग्दर्शनासाठी त्यांच्याशिवाय दुसरं कोणतं नाव आमच्या डोक्यात आलंच नाही. त्यांचा इतिहासाचा असलेला अभ्यास आणि त्यांची अभ्यासू वृत्ती ही खरोखर वाखणण्याजोगी आहे.”