Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजशिरूर तालुक्यात गहू काढणीला सुरूवात; वेळेत मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती

शिरूर तालुक्यात गहू काढणीला सुरूवात; वेळेत मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिरूर : शिरूर तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांच्या काढणी, मळणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मुख्य गहू उत्पादक शेतकऱ्यांनी गहू काढणी, मळणीसाठी हार्वेस्टरला पसंती दिली आहे. या हंगामात वाढलेले ऊन, यात्रा जत्रांचा हंगाम यामुळे मजूर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून शेतकऱ्यांनी हार्वेस्टरला पसंती दिल्याचे दिसत आहे.

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात जांबूत, काठापूर, पिपरखेड, चांडोह, फाकटे या ठिकाणी सध्या गहू काढणीला सुरूवात करण्यात आली आहे. कवठेयेमाई, मलठण, सविंदणे, आमदाबाद त्याबरोबर कान्हूर मेसाई, गणेगाव खालसा, मोराची चिंचोली, शास्ताबाद या ठिकाणी गहुचे उत्पादन करणारा शेतकरी व गव्हाचे क्षेत्र असणारा परिसर आहे. या परिसरात शेतात हार्वेस्टरच्या सहाय्याने गहू कापणी सुरू असून गहू उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. हरियाणा, पंजाब या ठिकाणाहून हार्वेस्टर यंत्र या ठिकाणी आली आहेत.

दरवर्षी रब्बी हंगाम संपल्यानंतर हे यंत्र याच भागात सुरक्षित व्यवस्थित ठिकाणी ठेवले जातात. नंतर हंगाम सुरू झाल्यानंतर पुन्हा शेतावर ही यंत्र आणली जातात. शिरूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी पारंपारिक शेतीला फाटा देत यांत्रीकीकरणाची कास शेतकऱ्यांनी धरली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे. त्यात गव्हाची काढणी व मळणी वेळेत व्हावी यासाठी हार्वेस्टर यंत्राचा वापर होताना दिसत आहे.

सध्या पहाटे जाणवणारी थोडीसी तुरळक थंटी तर सकाळ पासूनच जाणवणारा कडक उन्हाळा वातावरणात बदल घडवून आणत आहे. त्यात या काळात ग्रामदैवताच्या यात्रा, जत्रा, ऊरूस यामुळे मजूर गावाकडे जाऊ लागले आहेत. त्यातून मजूरांची कमतरता जाणवू लागली आहे. मजूरांचा होणारा तुटवडा आणि वेळेत होणारी बचत लक्षात घेऊन शेतकऱ्यांचा हार्वेस्टरकडे कल वाढला आहे. पारंपारिक पद्धतीने रब्बी पिकांची कापणी, मळणी करताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. हार्वेस्टरने वेगळी मजूरी मजूरांना द्यावी लागत नाही. शिवाय वेळेची बचत होत असल्याचे शेतकरी चांडोह गावचे पाडूरंग सालकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments