इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिरूर : ऊस तोडण्यासाठी ऊस तोडणी कामगार उपलब्ध करून देतो. असे खोटे सांगून, प्रत्यक्ष कारखान्याचा गाळप हंगाम संपला तरी ऊस तोडणी कामगार उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील ऊस वाहतूकदार कंत्राटदाराची सुमारे ११ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
गोकुळ चत्रु पवार, चत्रु तोताराम पवार, अशोक चत्रु पवार (सर्वजण रा. नागद-सोनवडी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) या ठगांच्या विरोधात मांडवगण फराटा येथील ऊस वाहतूक कंत्राटदार दत्तात्रय शहाजी फराटे (वय-३७) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, दत्तात्रय शहाजी फराटे यांनी श्रीगोंदा तालुक्यातील एका खासगी साखर कारखान्यासोबत गाळप हंगाम सन२०२४-२५ साठी ऊस वाहतूक करार केला होता. त्यामुळे त्यांना ऊस तोडणी कामगारांची आवश्यकता होती. तसेच गोकुळ चत्रु पवार हा फराटे यांच्या ओळखीचा ऊस तोडणी मुकादम असल्यामुळे, गोकुळ पवार याने दत्तात्रय फराटे यांना ऊस तोडणी मजूर उपलब्ध करून देतो, असे सांगितले होते. त्यामुळे दत्तात्रय फराटे यांनी गोकुळ पवार यांच्या मागणीवरून वेळोवेळी मे-२०२४ ते नोव्हेंबर-२०२४ दरम्यान गोकुळ चत्रु पवार, चत्रु तोताराम पवार, अशोक चत्रु पवार यांना ऊसतोडणी कामगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली ११ लाख ९ हजार रुपये एवढी रक्कम ऑनलाईन व बँकेतून आरटीजीएस करून दिली होती. परंतू, संबंधितांनी ऊस तोडणी कामगार उपलब्ध करून दिले नाहीत तसेच दिलेली रक्कमही पुन्हा माघारी दिली नाही. त्यामुळे आर्थिक फसवणूक झाल्याचे दत्तात्रय फराटे यांच्या लक्षात आल्यामुळे फराटे यांनी शिरूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलिसांचे पथक पुढील तपास करत आहेत.