इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिक्रापूर : येथील एका खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या शिक्षकदाम्पत्याच्या बालिकेला शाळेतील शिक्षिकेने मारहाण केली. याबाबत प्राचार्यांना जाब विचाल्यानंतर प्राचार्यांनी देखील पालक असलेल्या शिक्षक दाम्पत्याला धमकी दिल्याची घटना उघडकीस आली. याबाबत संतप्त पालकांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी मिरॅकल चॅम्प स्कूलचे प्राचार्य संदीप अडसूळ व शिक्षिका ज्योती मेढे (दोघे रा. कोयाळी गावठाण, शिक्रापूर ता. शिरूर, जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शिक्रापूर येथील अमित घोटणे व अंजली घोटणे या शिक्षक दाम्पत्यांची चार वर्षाची बालिका कोयाळी पुनर्वसन येथील खासगी मिरॅकल चॅम्प स्कूल या शाळेमध्ये शिक्षण घेत असून दुपारच्या सुमारास अंजली घोटणे या त्यांच्या मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेल्या असताना त्यांची मुलगी रडत होती. त्यावेळी अंजली यांनी मुलीला घरी नेले. मुलीचे कपडे बदलत असताना मुलीच्या अंगावर मारहाणीचे व्रण दिसू लागल्याने त्यांनी मुलीकडे विचारपूस केली असता मुलीने शाळेतील टीचरने स्टिकने मारहाण केल्याचे सांगितले. त्यांनतर अमित घोटणे व अंजली घोटणे यांनी शाळेचे प्राचार्य संदीप अडसूळ यांना फोन करत माहिती दिली असता प्राचार्यांनी पालकांना दमदाटी करत शिक्रापूर मध्ये राहायचे असेल तर शांत राहा, अशी धमकी दिली. पुढील तपास पोलीस हवालदार विश्वांबर वाघमारे हे करत आहेत.
अडसूळ यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या शाळेमध्ये बालिकेला मारहाण झालेली नसून सदर पालकांनी आमच्या शाळेची बदनामी करण्यासाठी गुन्हा दाखल केला असल्याचे अडसूळ यांनी सांगितले. विद्यार्थिनीला मारहाण झाली आहे. त्या शाळेमध्ये विस्ताराधिकारी यांना तातडीने पाठवून घडलेल्या प्रकारची चौकशी केली जाणार असल्याचे पंचायत समिती शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी सांगितले