इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिल्लीत त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची कार्यकारिणी बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी भाजपला निवडणूक चिन्ह देखील बदलण्याचा सल्ला दिला. त्यांनी भाजपला निवडणुकीचं नवं चिन्ह सूचवलं. त्यांनी केलेल्या टीकेवर उपस्थित असलेल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. यावेळी शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांकडून ईडीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय, असा आरोप केला. ईडीच्या भीतीमुळेच अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला, असा दावा शरद पवारांनी केला.
“देशाचं वातावरण बदलतंय. केरळमध्ये भाजप नाही. तमिळनाडूमध्ये नाही. गोव्यात नव्हती. मात्र निवडून आलेले आमदार फोडून आणली. आंध्र प्रदेशात भाजप नाही. महाराष्ट्रात भाजप नव्हती. मध्य प्रदेशमध्ये नव्हती. मात्र लोक तोडले. मग सरकार आणलं गेलं. राजस्थानमध्ये नाही. दिल्लीत नाही, पश्चिम बंगालमध्ये नाही. मग आहे कुठे ? छोट्या छोट्या राज्यात भाजप आहे. देशात मूड बदलत आहे. आपण सगळ्यांनी एकत्रित काम केलं पाहिजे”, असं शरद पवार म्हणाले.
‘मणिपूरची परिस्थित पाहून लाज वाटते’
“महात्मा गांधींचं नाव का घेता? तर त्यांनी सत्य, अहिंसा मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम केलं. भाजपने निवडून आणलेले सरकार तोडले. त्यांना कोण खरं बोलायला तयार नाही. मणिपूरची परिस्थित पाहून लाज वाटते. यावर कधी निर्णय घ्यावा वाटला नाही. दुकानं जाळली, घरं जाळली, तिथं जाऊन आधार देणं प्रधानमंत्रींच काम नाही? ही परिस्थित तिथे आहे”, असं शरद पवार म्हणाले.
‘ईडीचा राजकारणासाठी वापर सुरु’
“एजन्सीचा वापर सुरुय. काही दिवसांपूर्वी नावच माहीत नव्हतं. ईडीचं नाव माहीत नव्हतं. आजकाल भांडण झालं तर म्हणतात ईडी लावेन. दिल्लीतील राज्यसभा खासदारच्या घरावर छापा टाकला. आज सकाळी कोणी सांगितलं की इतर राज्यातही सुरु आहे. ममतांच्या सहकार्यावर ही सुरु आहे”, असा दावा शरद पवारांनी केला.
“अनिल देशमुख यांना अटक केली. त्यांना १३ महिने जेलमध्ये ठेवलं. काही नव्हतं सुप्रीम कोर्टान सोडून दिलं. शिवसेनेच्या संजय राऊत यांना अटक केली. त्यांनाही सुप्रीम कोर्टाने सोडलं. मोदींच्या विरोधात लिहितात म्हणून कारवाई केली. ईडी आणि सीबीआयचा राजकीय वापर केला जातोय, असा आरोप शरद पवारांनी केला.
“भाजप राजकीय पक्षांच्या विरोधात कारवाई करते. पंतप्रधान अशा ‘कामांना सपोर्ट करतात. मात्र पंतप्रधान पदाची जबाबदारी आणि राजकीय जबाबदारी वेगळी आहे. मी अनेकदा पंतप्रधान यांच्या बैठकांना गेलोय. आधीचे पंतप्रधान आणि आताच्या पीएम मध्ये फरक आहे. आधीचे पंतप्रधान विकास कामांच्या उद्घाटनाला गेल्यावर कधी राजकीय बोलत नव्हते. विरोधी पक्षाला शिव्या देत नव्हते”, असा टोला शरद पवारांनी लगावला.
शरद पवार चिन्हाबाबत नेमकं काय म्हणाले?
भाजपने निवडणूक चिन्ह बदललं पाहिजे. लोक म्हणतात त्यांनी चिन्ह बदलून वाशिंग मशीन करावं, असं लोक महाराष्ट्रात म्हणतात”, असा टोला शरद पवारांनी लगावला. “ईडी, सीबीआय आयटी यांचा गैरवापर केला जातोय. एका मीडिया हाऊसवर छापेमारी केली. त्यांच्या विरोधात तक्रार केली की चीनला मदत केली. कालची कारवाई ठीक नाही. ती कारवाई चुकीची आहे. त्यांनी भाजपची स्थिती मांडली होती. देशात बदल होईल”, असं शरद पवार म्हणाले.