Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजशरद पवारांचे निष्ठावान समर्थक, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदेंचं पुण्यात निधन; फलटणमधील शिंदेवाडीत...

शरद पवारांचे निष्ठावान समर्थक, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदेंचं पुण्यात निधन; फलटणमधील शिंदेवाडीत आज अंत्यसंस्कार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती. अखेर काल सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

फलटण शहर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषराव तुकाराम शिंदे (वय ७८) यांचे पुणे येथे काल (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. शरद पवार (Sharad Pawar) यांचे निष्ठावान समर्थक म्हणून त्यांची राज्यभर ओळख होती.

फलटण येथील जिद्द बंगल्यावर आज (ता. १४) सकाळी आठ वाजता त्यांचे (SubhashRao Shinde) पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ च्या सुमारास शिंदेवाडी (ता. फलटण) येथे त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

फलटण सहकारी दूध संघाचे चेअरमन, १९९० मध्ये विधानसभेची निवडणूकही (Assembly Election) लढवली होती. आरक्षण प्रश्नी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये अग्रणी राहात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. एक संघर्षशील व्यक्तिमत्त्व व नेतृत्व म्हणून ते सर्वपरिचित होते. जिल्ह्यात व सर्वसामान्य जनतेमध्ये ते ‘भाऊ’ या नावाने प्रसिद्ध होते. मनमोकळ्या स्वभावामुळे राज्यभर त्यांचा मोठा जनसंपर्क होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ते कायम एकनिष्ठ राहिले. एकनिष्ठ राहात असताना त्यांनी पक्षाकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दर वर्षी ते त्यांचा विशेष गौरव ग्रंथ प्रसिद्ध करीत होते.

शिंदेवाडीतील शरद-प्रतिभा शिक्षण संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष, तसेच फलटण येथील महात्मा शिक्षण संस्थेचेही ते अध्यक्ष होते. १३ फेब्रुवारीला रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने फलटण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्यांची शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती व लवकर बरे व्हा, आपल्याला लोकसभा निवडणुकीत प्रचार करायचा आहे, असे सांगितले होते.

गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती जास्त खालावली होती. अखेर काल सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. फलटण शहरातील त्यांच्या ‘जिद्द’ बंगल्यावर आज (ता. १४) सकाळी आठ वाजता अंतिम दर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११च्या सुमारास शिंदेवाडी (ता. फलटण) येथे त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात फलटण बाजार समितीचे सदस्य चेतन शिंदे, सून, सहा मुली, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments