इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : विवाह करण्याचे आमिष दाखवून संगणक अभियंता तरुणीची ३४ लाखांची फसवणूक करणाऱ्या एकाला बाणेर पोलिसांनी मुंबईतून अटक केली. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
साईश विनोद जाधव (वय २५, रा. चेंबूर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तक्रारदार तरुणी बाणेर भागातील एका हॉस्टेलमध्ये राहायला आहे. ती बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीस आहे. तिने २०२३ मध्ये एका विवाहविषयक संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. आरोपी साईश जाधव याने तिच्याशी संपर्क साधून विवाह करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. त्यानंतर मे २०२३ मध्ये तो तिला भेटण्यासाटी बाणेर परिसरात आला.
पिडीत तरुणीने त्याच्या कुटुंबीयांबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून, भाऊ दुबईत नोकरीला आहे, अशी बतावणी केली. तरुणीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. दोघांमध्ये संवाद वाढला. त्यानंतर एका मित्राने माझी आर्थिक फसणूक केली असून, पैसे न भरल्यास मला कारागृहात जावे लागेल, अशी बतावणी केली.
अडचणीत असल्याने त्वरित आर्थिक मदत हवी आहे, असे सांगून त्याने तरुणीला तातडीने पैसे पाठविण्यास सांगितले. तरुणीने ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविले. तिने कंपनीतील व्यवस्थापकांकडून वेळेवेळी १५ लाख रुपये घेतले व खासगी वित्तीय संस्थेकडून तिने कर्ज काढून आरोपी साईशला पैसे पाठविले. गेल्या दीड ते पावणेदोन वर्षात त्याने तरुणीकडून वेळोवेळी ३३ लाख ८२ हजार रुपये घेतले. तरुणीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा सुरू केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. बाणेर पोलिसांनी तपास करून आरोपी साईशला अटक केली.