इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचा साथीदार विष्णू चाटे हे दोघे फरार असताना नाशिकच्या दिंडोरी येथील एका आश्रमात वास्तव्यास होते. जवळपास १५ दिवस ते याठिकाणी थांबले तरी, कोणालाच याचा थांगपत्ता नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या आश्रमातील सदस्यांची एसआयटी आणि सीआयडी या तपास यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी पुण्यात केली.
दिंडोरीतील आश्रमात लैंगिक शोषणाच्या काही महिलांनी केलेल्या तक्रारींवरून देसाई यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. देसाई म्हणाल्या, दिंडोरीच्या आश्रमात लैंगिक शोषण होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे काही महिलांनी केल्या आहेत. याबद्दल सविस्तरपणे मी बोलणार आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याच आश्रमात राहिले. पण तपास पथकांना इतके दिवस कसे सापडले नाहीत ? असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित केला.
वाल्मिक कराड हा आश्रमात दर्शनासाठी गेला होता, असे कारण आता पुढे केले जात आहे. परंतु, हे प्रकरण दाबण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. आश्रमातील काही सदस्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उत्तम संबंध आहेत. त्यामुळे या सदस्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार होऊ शकतो. सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच गृहखाते असल्याने त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी देखील देसाई यांनी यानिमित्ताने केली.