इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
मुंबई : भारताने पाचव्या टी20 सामन्यात इंग्लंडचा दणदणीत पराभव केला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भारताच्या पथ्थ्यावर पडला आणि अभिषेक शर्माच्या फलंदाजीसमोर इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरशः शरण जावं लागलं. शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 37 चेंडूत शतक पूर्ण केलं. यानंतर त्याच्या फलंदाजीचा झंझावात सुरु राहिला.
अभिषेक शर्माने 54 चेंडूत 135 धावा केल्या. त्याच्या झंझावाती खेळीमुळे टीम इंडियाने 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावांचा डोंगर उभा केला आणि विजयासाठी 248 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान खरं तर खूपच कठीण होतं. पण इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. पण त्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या आणि पराभव नजरेस पडू लागला. इंग्लंडचा डाव 97 धावांवर गडगडला आणि भारताने हा सामना सहज 150 धावांनी आपल्या नावावर केला.
इंग्लंडकडून फिलीप सॉल्टने चांगली खेळी केली. त्याने 23 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 55 धावा केल्या. पण त्याची विकेट काढण्यात शिवम दुबेने यश मिळवलं. त्यानंतर सामना भारताच्या बाजूने झुकला. भारताने पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 ने जिंकली.