इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : बेकायदेशीरपणे पिस्टलची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना येरवडा पोलिसांनी वाडिया बंगल्याजवळ बुधवारी (ता.5) अटक केली. प्रविण विकास कसबे (वय 29, रा. आंबेगाव-कात्रज, पुणे) व प्रतिक दादासाहेब रणवरे (वय 25, रा. येवलेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 30 हजार रुपये किंमतीचे 1 पिस्टल व 1 राऊंड हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या शस्त्र बाळगून गुन्हे करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने येरवडा पोलिसांचे तपास पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते.
दरम्यान, गस्त घालत असताना तपास पथकातील पोलीस शिपाई अमोल गायकवाड व विशाल निलख यांना दोन इसम बेकायदेशीरपणे पिस्टलची विक्री करण्यासाठी वाडिया बंगला परिसरात येणार आहेत, अशी माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपींकडे 1 पिस्टल व 1 राऊंड मिळून आले. दोन्ही आरोपींच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा 3 (25) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम 37 (1) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
ही कामगिरी येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) स्वाती खेडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, सर्व्हेलन्स अधिकारी पोलिस उपनिरीक्षक महेश फटांगरे, पोलिस उपनिरीक्षक प्रदिप सुर्वे, पोलिस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, पोलिस अंमलदार अनिल शिंदे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांच्या पथकाने केली आहे.