इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणीकंद, (पुणे) वाघोली, भावडी व लोणीकंद परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या खान क्रेशर उद्योगांमुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या उद्योगांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा परिणाम लहान मुले, वृद्ध आणि इतर नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे शासनाने या परिसरातील खान क्रेशरवर कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, चंद्रकांत वारघडे हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलीस आयुक्तापासून ते परिसरातील सरपंचाना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी या परिसराची समक्ष पाहणी करून परिस्थितीचा अनुभव घ्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.
धूळ आणि प्रदूषण यामुळे अनेकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप यांसारखे त्रास होत आहेत. याशिवाय रस्त्यावर सतत पडलेली धूळ, वाहतूक कोंडी आणि डंपरमुळे होणारे अपघात यामुळे नागरिक हैराण झाले आहेत, या परिसरात पूर्वी लोकसंख्या कमी असल्यामुळे समस्या जास्त जाणवत नव्हती. मात्र गेल्या काही वर्षांत लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या वाढीमुळे पर्यावरणीय प्रश्न तीव्र झाला आहे. घरांवर आणि शेतीवरही प्रदूषणाचा परिणाम दिसून येत असून शेती नापीक होत आहे. ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जात आहेत.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी 17 अनधिकृत क्रेशर लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदारांनी सील केले होते. परंतु दोनच दिवसांत हे पुन्हा सुरू झाले. हे उद्योग नियमांना पायदळी तुडवत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे हे उद्योग कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली आहे. याबाबत शासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास सर्व नागरिक मिळून आमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. याची दखल शासनाने घ्यावी. तसेच या निवेदनाद्वारे पुणे वाहतूक विभागालाही डंपर वाहतुकीची आकडेवारी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.