इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोरः गर्दी व्यवस्थापनाचा पहिला टप्पा म्हणजे योग्य नियोजन करणे, गणपती दर्शनावेळी लोक कुठून येणार आहेत, कुठे फिरणार आहेत, कुठे बसणार आहेत आणि कुठून बाहेर पडणार आहेत. बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे खुला आहे की नाही याची आखणी करून घावी. आपत्तीच्या वेळेस गर्दीत खाली पडून अडकलेल्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढताना प्रशिक्षित स्वयंसेवक व पोलीस तसेच आयोजकांनी योग्य नियोजन केले तर दुर्घटना टाळता येतील असे प्रतिपादन रेसिलेंट इंडिया या आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रशिक्षक राजीव चौबे यांनी केले.
पुणे शहर पोलीस दलातील परिमंडळ 5 च्या वतीने वानवडी येथील जांभुळकर गार्डन येथे गणेशोत्सवा दरम्यान होणाऱ्या गर्दीचे नियोजन कसे करावे याचे प्रशिक्षण गणपती मंडळ स्वयंसेवक व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रशिक्षक राजीव चौबे बोलत होते. याप्रसंगी परिमंडळ 5 चे उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे बाळासाहेब ढवळे पाटील, अमोल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सत्यजित आदमाने, अमोल मोरे, माया देवरे, संतोष पाटणकर, राजेंद्र पन्हाळे, विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त राजाभाऊ कदम, ट्रस्टी शंतनु जगदाळे, समन्वयक सलीम शेख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राजीव चौबे पुढे म्हणाले प्रत्येक गणपती मंडळात प्रशिक्षित स्वयंसेवकांचे पथक असणे गरजेचे आहे, गर्दीच्या वेळेस पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाला कळवून एकमेकांचा समन्वय साधून योग्य दिशा ठरवून एकजुटीने प्रत्येक कृती अमलात आणल्यास उत्सव सुरक्षित पार पडतो. पोलीस उपायुक्त डॉ राजकुमार शिंदे म्हणाले कोणत्याही स्वरुपाच्या गर्दीचे व्यवस्थापन करत असताना लोकांचा जाण्याचा व येण्याचा मार्ग वेगळा असला पाहिजे, कुठेही क्रॉस फ्लो होऊ नये, पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे, गणेश मंडळांकडे गर्दी नियंत्रणासाठी रस्सी, बोरेकेड व स्वयंसेवक असले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.
या प्रशिक्षणा मध्ये 100 पोलीस अधिकारी, 500 पोलीस अंमलदार, 400 स्वयंसेवक व गणेश मंडळांचे कार्यकर्ते नागरिक यांना गर्दी नियोजन व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. गर्दीत अडकलेल्या व खाली पडलेल्या व्यक्तींना गर्दीतून सुरक्षित कसे बाहेर काढायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले.