इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः हुशार आणि गंभीर गुन्ह्यांना अत्यंत साधेपणाने व शांत राहून गुन्हे करणाऱ्या एका कुविख्यात सराईताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २० गुन्ह्यांची उकल झाली असून, ३० लाखांचा ऐवज देखील जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. विश्रामबाग पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
जफर शहाजमान ईराणी (वय ४१, रा. लोणी काळभोर, पठारे वस्ती, मुळ. रा. कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहरात चैन स्नॅचिंग करणारे तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांना एकट्याला गाठून त्यांना पोलीस असल्याची बतावणीकरून हातचालाखीने दागिने व रोकड पळविण्याच्या घटना घडत आहेत. यापार्श्वभूमीवर गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीसांना टोळ्या व चोरट्यांना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. तर, दुसरीकडे सराईतांवर नजर ठेवली जात असून, हद्दीतील हस्त व पेट्रोलिंग सुरूच आहे.
दरम्यान, विश्रामबाग पोलिसांच्या पथकाकडून शनिवार पेठेत भल्या सकाळी घडलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास केला जात होता. तेव्हा तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून जफर ईराणी याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याच्याकडे केलेल्या सखोल तपासातून आरोपीने गुन्हे केल्याचे समोर आले आहेत.
जफर याच्याकडून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील फसवणूक, जबरी चोरी व चोरी असे २० गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच, रोख दीड लाख व सोन्याचे दागिने असा एकूण २९ लाख ६४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. जफर याने कोणाच्या साथीने हे गुन्हे केले आहेत का, त्याचे कोण कोण साथीदार आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.