Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून...

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुरके 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त; विद्यार्थिनींनी दिला भावनिक निरोप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर लोणी काळभोर व परिसरातील विद्यार्थिनींना चांगल्या शिक्षणाबरोबरच सुसंस्कृत संस्कार देण्याचे काम कन्या प्रशालेने केले आहे. या शाळेच्या अनेक विद्यार्थिनी विविध क्षेत्रात कार्यरत असून देशाच्या कानाकोपऱ्यात काम करीत आहेत.

या प्रशालेची यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या आदर्श मुख्याध्यापिका निशा झिंजुरके या 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. चांगल्या शिक्षिका सेवानिवृत्त झाल्या असल्या तरी नेहमी आपल्याला त्या मार्गदर्शन करतील. असे प्रतिपादन केंदुर (ता. शिरूर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी केले आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशालेच्या आदर्श मुख्याध्यापिका निशा मधुकर झिंजुरके यांच्या सेवापुर्तीचा निरोप सोहळा गुरुवारी (ता.27) मोठ्या थाटामाटात पार पडला. यावेळी बोलताना वरील प्रतिपादन प्राचार्य अनिल साकोरे यांनी केले.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोर येथील स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष सुभाष अप्पा काळभोर, कार्याध्यक्ष राहुल काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, उपसरपंच प्रियांका काळभोर, विठ्ठल काळभोर, भारती काळभोर, संगीता काळभोर, प्राचार्य अनिल साकोरे, मुख्याध्यापिका पौर्णिमा शेवाळे आदि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुभाष काळभोर म्हणाले की, विद्यार्थी हा शाळेचा केंद्रबिंदू असतो. त्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक नेहमी प्रयत्न करीत असतात. हेच ध्येय स्वीकारून मुख्याध्यापिका निशा झिंजुरके यांनी ज्ञानदानाचे पवित्र काम केले आहे. प्रामाणिक, संयमी, शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय अशी ओळख त्यांची आहे. हे खूप मोठ व्यक्तिमत्त्व आज सेवेतून निवृत्त होत आहे. याची थोडीशी खंतही वाटत आहे.

निशा झिंजुरके यांनी ज्ञानदानाच्या प्रवासाची सुरुवात श्री शिवाजी विद्यालय (भोर) येथून केली. त्यानंतर पुरंदर हायस्कूल सासवड, कन्या प्रशाला सासवड, रवींद्रनाथ टागोर विद्यालय (वीर) आणि कन्या प्रशाला (लोणी काळभोर ता. हवेली) येथून सेवापूर्ती झाली. झिंजुरके यांनी अत्यंत प्रामाणिक व सचोटीने सेवा केली. एक शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांमध्ये आपली ख्याती आहे.

गणित, विज्ञान हे विषय विद्यार्थ्यांना सहजगत्या समजावून दिले, त्या विषयांची गोडी निर्माण केली. बारकाईने लक्ष दिले. शालेय शिस्त, गुणवत्ता वाढीसाठी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे लोणी परिसरामध्ये कन्या शाळेचा शिस्त आणि गुणवत्तेचा ठसा उमटला. परिणामी प्रशालेकडे प्रवेशाचा ओढा वाढला आणि संख्येने परिपूर्ण असलेली नावाजलेली शाळा प्रगतिपथावर आहे.

निशा झिंजुरके यांनी 34 वर्ष 6 महिन्यांच्या प्रदीर्घ कालखंडात, अनेक डॉक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक, शासकीय अधिकारी, इ. सामाजिक रत्ने घडविली. फणसाप्रमाणे वरून काटेरी, शिस्तप्रिय; परंतु अंतरी प्रेमळ जिव्हाळा अशा संवेदनशील स्वभावामुळे त्यांचा संपर्क समूह खूप मोठा आहे.

झिंजुरके यांना भोर मुख्याध्यापक संघामार्फत ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’, हवेली मुख्याध्यापक संघातर्फे गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार’, ‘सावित्रीबाई फुले प्रेरणा समाजभूषण पुणे जिल्हा पुरस्कार’ इ. सन्मान मिळाले आहेत. निशा झिंजुरके यांचे पती मधुकर झिंजुरके हे एक प्रसिद्ध वकील आहेत. तर मुलगा ओंकार हा डॉक्टर असून वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवीत आहे.

दरम्यान, यावेळी विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिका झिंजुरके यांना मिठी मारून भावनिक निरोप दिला. शाळेची विद्यार्थिनी रागिणी आवारे, अनुष्का बारड व शिक्षिका वंदना सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या मानपत्राचे वाचन पांडुरंग पाटील यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रस्तावित शिक्षिका रुमा तिडके तर सूत्रसंचालन अश्विनी मोकाशी यांनी केले. उपस्थित सर्व पाहुण्यांचे आभार सुधाकर ओव्हाळ यांनी मानले.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षणमहर्षी बापुजी साळुंखे यांच्या आशीर्वादाने विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी बापुजींची ऋणी आहे. या संधीचे सोने करून विद्यार्थिनीची जबाबदारी स्वीकारली त्यांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार देण्याचे काम केले. हे ज्ञानदानासारखे पवित्र काम माझ्या हातून घडले म्हणून मी स्वतः ला भाग्यवान मानते. व सेवापुर्तीचा निरोप सोहळ्याला आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments