इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, ता. 13: वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटातफोर्ड एंडेवर गाडी 100 मीटर दरीत कोसळून झालेल्या अपघातात, लोणी काळभोर (ता. हवेली) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात फोर्ड एंडेवर मधील त्यांचे दोन सहकारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
अक्षय म्हस्कू काळभोर (वय-26), सौरभ जालिंदर काळभोर (वय-26) ही अपघातात मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावे आहेत. तर वैभव काळभोर, (वय- 24) बजरंग पर्वतराव काळभोर (वय-35, सर्व रा. रायवाडी, लोणी काळभोर, ता. हवेली) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही जखमींना वाई (सातारा) येथील बेलर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी (ता.13) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरील चौघेही मित्र असून लोणी काळभोर परिसरातील रायवाडी परिसरात राहतात. मागील दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. फिरून झाल्यानंतर आज गुरुवारी (ता. 13) पाच वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथून लोणी काळभोरकडे घरी निघाले होते.
दरम्यान, वाई-पाचगणी रस्त्यावरील पसरणी घाटात आले असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट 100 मीटर दरीत कोसळली. यावेळी वाई पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने चौघांना वाई येथील बेलर या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अक्षय काळभोर व सौरभ काळभोर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर बजरंग पर्वतराव काळभोर व वैभव काळभोर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेलर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.