इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर, ता. 10 लोणी काळभोर व परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. गारांच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले, तर ऊस पिकाला काहीसा दिलासा मिळाला आहे. ब-याच शेतात पाणी साचले आहे.
संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारांस साधारण अर्धा तास वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे हवेली तालुक्याच्या पूर्व भागात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पूर्व हवेलीत उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली होती. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी दिवसभर विद्युत पुरवठा बंद ठेवून वीज वाहक तारांच्या जवळील झाडांच्या फांद्या तोडून घेतल्या. पाच वाजता काम संपल्यावर विद्युत पुरवठा चालू करायच्या वेळी अवकाळी पाऊस आला. वा-यामुळे काही ठिकाणच्या झाडांच्या फांद्या तारांवर पडल्याने परत विद्युत पुरवठा खंडित झाला.
आंब्याच्या कै-या गळून गेल्या असून कांदा, भाजीपाला या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालक, कोथिंबीर, मेथी या सारख्या पालेभाज्यांचे तर प्रचंड नुकसान झाले आहे. काढायला आलेली मेथी, पालक यांची पाने गारपीटीमुळे तुटून जातात. त्यामुळे अशा भाजीला बाजारात कुणीही विकत घेत नाही. पनवेल काकडी सोडून देण्याशिवाय पर्यायच नाही. संबंधित सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.