Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजलोणी काळभोरमधून नोकरदाराचे अपहरण करून मागितली १ कोटीची खंडणी; 7 जणांवर...

लोणी काळभोरमधून नोकरदाराचे अपहरण करून मागितली १ कोटीची खंडणी; 7 जणांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे) शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यानंतर पैसे माघारी मागत असल्याचा राग मनात धरून नोकरदाराचे कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मनाली रिसॉर्टमधून अपहरण करून 1 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित रोकडे, दयानंद रोकडे (दोघेही रा. अहमदपूर, लातूर) अमोल क्षिरसागर (रा. पर्वती पुणे) व चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्वास भानुदास शितोळे (वय-34, धंदा नोकरी, रा. प्लॅट नं. 2204, आय विंग, पुणे व्हिले सोसायटी, फेज 2, पुणावळे. पिंपरी चिंचवड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विश्वास शितोळे हे नोकरदार असून वर्क फ्रॉम होम काम करीत आहेत. विश्वास शितोळे आणि आरोपी अमित रोकडे, दयानंद रोकडे व अमोल क्षिरसागर एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांच्या ओळखीचा फायदा घेऊन आरोपींनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळवून देऊ, असे सांगून विश्वास शितोळे यांचा विश्वास संपादन केला.

फिर्यादी विश्वास शितोळे यांनी थोडेफार पैसे गुंतविल्यानंतर आरोपींनी त्यांना चांगला परतावा मिळवून दिला. त्यानंतर तुमच्याही कोण ओळखीचे असतील तर त्यांनाही यामध्ये पैसे गुंतविण्यास सांगा. त्यांनाही चांगले पैसे मिळवून देऊ. तसेच तुम्हालाही कमिशन देऊ. असे आश्वासन दिले. त्यानंतर विश्वास शितोळे यांनी त्यांचे नातेवाईक व ओळखीच्या लोकांकडून सुमारे 6 कोटी रुपयांच्या आसपास पैसे गोळा करून आरोपींना दिले.

दरम्यान, शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्याचा कोणत्याही प्रकारचा परतावा माघारी मिळत नसल्याने विश्वास शितोळे यांच्याकडे नागरिकांनी पैसे मागायला सुरवात केली. त्यामुळे फिर्यादी विश्वास शितोळे याने तिन्ही आरोपीकडे पैसे मागण्याचा तगादा सुरु केला. फिर्यादीच्या तगाद्याला आरोपी वैतागले होते. त्यामुळे याचा कायमचा काटा काढण्यासाठी आरोपींनी कट रचून चार जणांना याची सुपारी दिली.

त्यानंतर आरोपींनी पैसे देण्याच्या बहाण्याचे फिर्यादी विश्वास शितोळे यांना कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मनाली रिसॉर्ट येथे मंगळवारी (ता.21) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोलावले. त्यानुसार फिर्यादी तेथे आले. फिर्यादी विश्वास शितोळे तेथे आल्यानंतर एक्सयु 700 जांभळ्या रंगाची महिंद्रा कंपणीच्या गाडीतील 4 अनोळखी इसमांनी त्यांचे जबरदस्तीने अपहरण केले.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरच्या दिशेकडे नेले. व विश्वास शितोळे यांना जिवे मारण्याची धमकी देवुन 1 कोटी रुपयांची मागणी केली. मात्र फिर्यादी शितोळे यांच्याकडे पैसे नसल्याने चार अनोळखी आरोपींनी पुन्हा फिर्यादी यांना माघारी सोडविले. आणि आरोपी अमित रोकडे, दयानंद रोकडे व अमोल क्षिरसागर यांनी रचलेला डाव फसला.

याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments