इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे: सायबर चोरट्यांनीआता टास्कचे आमिष दाखवून ऑनलाईन लूट सुरू केली आहे. त्यासाठी सुरुवातीला विश्वास संपादित करण्यासाठी काही रक्कम संबंधिताला पाठविली जाते. त्यानंतर त्यांना टास्क पूर्ण केल्यास जादा परतावा देण्याचे सांगून ऑनलाईन गंडा घातला जात आहे. मागील काही दिवसांपासून ऑनलाईन लुटीमुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
प्रीपेड टास्क पूर्ण करण्याच्या नादात लोणीकंदमधील एका महिलेने तब्बल ३२ लाख रुपये गमाविले आहेत. ही घटना ६ ते २८ नोव्हेंबर कालावधीत घडली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार महिला लोणीकंदमध्ये राहायला असून, ६ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. त्यांचा विश्वास संपादित करून विविध प्रीपेड टास्क दिले. टास्क पूर्ण करण्यासाठी रक्कम पाठविण्यास भाग पाडले. त्याद्वारे अतिरिक्त कमाईचे आमिष सायबर चोरट्यांनी महिलेला दाखविले. ३२ लाखांवर रक्कम पाठविल्यानंतरही परतावा मिळाला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.