इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरातून लोखंडी सेंट्रिंग प्लेटची चोरी करणाऱ्या चार चोरट्यांना दौंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून एका चारचाकी वाहनासह ६ लाख १४ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती दौंडचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली आहे.
सचिन अरुण कांबळे (वय-२१), विकास लक्ष्मण तरंगे (वय-२३), आदित्य विभीषण अंकुश (वय-१९), रोहित दत्तात्रय कटाळे (वय-२०, सर्व रा. उरुळी कांचन, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हा प्रकार रविवारी (दि. ३) घडला होता. याबाबत मनीष कुंडलिक वारवकर (रा. बारवकरमळा, केडगाव, ता. दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड पोलिस स्टेशन हद्दीतील कुरकुंभ एमआयडीसी येथील सामाईक सांडपाणी शुध्दीकरण प्रक्रिया केंद्राजवळील परिसरातून बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सेंट्रिंग प्लेटची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती. या चोरीच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू होता.
त्यानुसार दौड पोलिसांनी संशियत आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यात आरोपींनी ५७ नग लोखंडी सेंट्रिंग प्लेटची चोरी करून त्या प्लेट एमएच ४२ बीएफ ६०८९ या चारचाकी वाहनातून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी या चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून ६ लाख १४ हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करत आहेत