इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पिंपरी-चिंचवडः वाकड येथे धक्कादायक घटना घडली आहे.लघुशंका करताना शिंतोडे उडाल्याने दोघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना वाकड येथील भूमकर चौकात गुरुवारी (10 एप्रिल) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल कचरू घेवंदे (वय 40 वर्षे, रा. भूमकर वस्ती, वाकड, मूळगाव चिखली. जि. बुलढाणा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल यांच्या पत्नीने शनिवारी (12 एप्रिल) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यश सुनील कलाटे (वय 22 वर्ष), मारुती किसन गुंडेकर (वय 21 वर्षे, दोघेही रा. कलाटे वस्ती, वाकड) यांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील भूमकर चौकाजवळील मोकळ्या मैदानातून राहुल घेवंदे घरी जात होते. त्यावेळी तेथे आरोपी यश कलाटे आणि मारुती गुंडेकर लघुशंका करत होते. त्यांच्या बाजूला राहुल घेवंदे देखील लघुशंका करत होते. लघुशंका करत असताना लघुशंकेचे शिंतोडे यश कलाटे याच्या पायावर पडले. या कारणावरून त्यांनी राहुल घेवंदे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली.
तू येथे लघवी का करतोय, तुला निट लघवी करता येत नाही का, असे म्हणत संशयितांनी राहुल यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात राहुल गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या राहुल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी (12 एप्रिल) ला त्यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.